TOD Marathi

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते.

मात्र अखेर शेवटी टाटा सन्सनं यात बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळे एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेलं आहे.

टाटा समूहाने १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने १९५३ साली आपल्या ताब्यात घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा तब्बल ६७ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा समूहाकडे आली आहे.