TOD Marathi

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटांकडून बुधवारी (५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवारांच्या गटाला नियुक्त्यांचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आता अजित पवार गटातील बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी आम्हालाही कायदे कळतात असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

छगन भुजबळ म्हणाले, “दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मात्र, जसजसे भाषणं होतील तसतसे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. आज ४० पेक्षा अधिक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही वाहतूक कोंडीत अडकले, काही परदेशात अडकले, तर कुणी आजारी आहे. या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.”

हेही वाचा” …पटेलांकडून प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“लोक सातत्याने विचारतात की, तुमच्यावर कारवाई होईल. शरद पवारांनंतर मीही शिवसेना पक्ष निर्माण झाला तेव्हापासून ५७-५८ वर्षे काम करतो आहे. मंचावर बसलेले नेतेही ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे जे लोक सांगतात की, ही कारवाई होईल, ती कारवाई होईल त्यांनी लक्षात घ्यावं की या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही पुढचं पाऊल टाकलं आहे,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

“सगळा विचार झाला आहे. असं नाही की, सकाळी उठलो आणि चला चला मंत्रीपदाची शपथ घेऊ. काय प्रक्रिया आहे, काय कायदे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे काय निकाल आहेत या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचललं आहे. हे म्हणतात तुमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत का, तुमच्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत का, आमदार आहेत का. हे सभागृह तुडुंब भरलं आहे, पाठीमागे जागा नाही आणि बाहेर वाहतूक कोंडी झालीय इतकी गर्दी आहे,” असंही भुजबळांनी नमूद केलं.