TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 जुलै 2021 – आज मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज राज्यातील नऊ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला झोडपले आहे. काल रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने मुंबईत अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.

आज मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर पुणे, ठाणे, पालघर आणि सातारा या ४ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

या जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. तर पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आज सकाळपासून अरबी समुद्रातील काही भागासह मुंबई, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये आकाशात ढगांची दाटी नोंदवली आहे. तर पुणे परिसरातही आज दुपारपासून पावसाचे ढग जमत आहेत.

यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी आकाश भरून आलं. त्यामुळे आज राज्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे.