शिर्डी | शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या ‘मतोश्री’ या निवासस्थानी वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे हे काँग्रेस, भाजप असा प्रवास करून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी एक छोटेखानी भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात चमत्कार घडतोय. हाच चमत्कार आता देशात घडणार आहे. चार-पाच दिवसांपूर्वी भाऊसाहेब मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की मी चूक केली, त्यामुळे मी तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. मी त्यांना म्हटलं, भाऊसाहेब, माझी माफी मागितली नाही तरी चालेल, परंतु, माझ्या शिवसैनिकांची माफी मागा.
हेही वाचा ” …“कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, त्यामुळे…”, शिरसाटांचा मोदी सरकारला घरचा आहेर”
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, अशी पक्षांतरं खूप पाहिली आहेत. परंतु, पक्ष संपवण्याचं कटकारस्थान करणारे राजकारणी आणि पक्ष आपण पहिल्यांदाच पाहतोय. मी एकटाच, फक्त माझा पक्षच राहील, बाकीचे सगळे पक्ष मी संपवून टाकेन, ही त्यांची मस्ती आपल्याला उतरवायची आहे. मी लवकरच शिर्डीला येईन. तिथे भव्य सभा घेणार आहे. जे लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यांना साईबाबांच्या साक्षीने आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आव्हान देतोय, हिंमत असेल तर मैदानात या, निवडणुकीला सामोरे जा.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून माझ्या शिवसैनिकाला छळताय, त्याचा बदला माझा शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही. भाऊसाहेब पक्ष सोडून गेले होते, त्यांना चूक समजली आहे. भाऊसाहेबांनी चूक केली होती, त्यांनी कसलंही पाप केलं नव्हतं. त्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं नाही. ते कधी मातोश्रीविरुद्ध किंवा शिवसेनेविरुद्ध काही बोलले नाहीत.