TOD Marathi

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील आमदार-खासदारांसह केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बंडखोर मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन हल्लाबोल करत आहेत. पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेत जोरदार वातावरणनिर्मिती केली. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या गटाकडूनही मोर्चेबांधणी केली जात असून शरद पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांना घेरण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील आणि सध्या शिवसेनेत असलेल्या योगेश क्षीरसागर यांना आपल्याकडे खेचण्यात अजित पवार गटाला यश आलं आहे. योगेश क्षीरसागर यांचा आज मुंबईत पक्षप्रवेश झाला. मात्र या प्रवेश सोहळ्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवरून शरद पवार यांचा फोटो गायब असल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीतील बंडानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार हेच आमचे नेते असल्याचं सांगितलं जात होतं. तसंच सर्व पोस्टर्सवर शरद पवारांचा फोटोही लावण्यात येत होता. मात्र स्वत:चं नाणं खणखणीत नसल्यामुळेच हे लोक माझ्या फोटोचा वापर करत असल्याचं सांगत शरद पवार यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. पवार यांच्या या इशाऱ्यानंतर आता अजित पवार गटाने सावध भूमिका घेत आपल्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो वापरणं टाळल्याचं दिसत आहे.

हेही वाचा “ …“…त्यांची मस्ती उतरवायची आहे”, उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदे गटावर हल्लाबोल”

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला. योगेश हे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. क्षीरसागर घराण्यातील आमदार संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात बीडमध्ये शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित केली होती. त्यामुळे त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, जयदत्त क्षीरसागरांनी अद्याप ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबल्याचे दिसते. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत असणारे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी मात्र वेगळा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी आधी अजित पवार यांची भेट घेतली आणि आज त्यांच्या पक्षात प्रवेशही केला.