TOD Marathi

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी अलीकडे केलेल्या एका भाषणात “लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या घोड्याला सावरकर कळत नाही” अशी जाहीर मात्र अप्रत्यक्ष टीका राहुल गांधी यांच्यावर केली होती. (Rahul Gandhi) त्यानंतर त्यांचं हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालं. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकाही होत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी (Dr. Vishwambhar Choudhari) यांनी हे शरद पोंक्षे यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात विश्वंभर चौधरी यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात,

दहशतवाद विरूद्ध संविधान…

पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो.

तुम्ही मोदी शहांचे दिल्लीचे पोलीस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलीस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो.
आहे का तयारी?

असं म्हणत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी शरद पोंक्षे यांना खुलं आव्हानच दिलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय आहे का? प्रत्येक गावात असे विद्यालय हवेत, असे सावरकर कार्यक्रम व्हायला हवेत. या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला. मी त्यांचं कौतुक करतो. असंही ते म्हणाले होते. सोबतच ही मुलं बघा, आणि दिल्लीतला मुलगा बघा, या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही, अशी टीका राहुल गांधी यांचा नाव न घेता पोंक्षे यांनी केली होती.

शरद पोंक्षे हे आघाडीचे अभिनेते आणि कला विश्वातील जान असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपला विशेष ठसा उमटवलेला आहे. शरद पोंक्षे नेहमीच आपली मतं स्पष्ट मांडत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना टीकेच्या स्थानीही राहावं लागतं.