टिओडी मराठी, परळी, दि. 6 सप्टेंबर 2021 – महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्यातील वाद आता पुन्हा समोर आलाय. करूणा शर्मा परळीमध्ये दाखल झाल्यावर गौप्यस्फोट करणार होत्या. मात्र, त्यांना स्थानबद्ध केलं आहे. करूणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तुल सापडल्याची घटना समोर आली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन दिवसांपूर्वी करूणा शर्मा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी परळीमध्ये येऊन गौप्यस्फोट करणार आहेत, असं सांगितलं होतं. आज दुपारी त्यांची पत्रकार परिषद देखील होणार होती. पण, परळीमध्ये दाखल होताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करूणा शर्मा यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या वाहनामध्ये एक वस्तू ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
करूणा शर्मा यांचे वाहन कार्यकर्त्यांनीं अडवले. त्यानंतर करूणा शर्मा यांच्या विरूद्ध घोषणाबाजी हि केली. त्यावेळी एक महिलेने त्यांच्या वाहनाच्या मागील दरवाजा उघडून त्यात एक वस्तू ठेवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. करूणा शर्मा यांच्या वाहनाच्या मागील भागातच पोलिसांना पिस्तुल सापडलंय. त्यामुळे व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने हे पिस्तुल ठेवली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या व्हिडीओत काही पुरूष हि महिलेला मदत करत आहेत, असे दिसत आहे. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेली एक महिला पोलीस झालेला हा प्रकार पाहत आहे, असे आढळत आहे. त्यामुळे आता करूणा शर्मा यांना अडचणी आणण्यासाठी हा खेळ रचला होता का?, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.