TOD Marathi

टिओडी मराठी, चिपळूण, दि. 24 ऑगस्ट – माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मी काय साधा माणूस वाटलो का?, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा, नाहीतर प्रसिध्दी माध्यमांवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी दिला आहे. चिपळूणमध्ये नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते. त्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत त्यांना विचारले असता नारायण राणे म्हणाले, तुमच्या माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन.

आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचे वक्तव्य केले होते तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?, असा सवाल राणे यांनी केला.

देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणे, हा देशाचा अपमान आणि राष्ट्रद्रोह आहे. याबाबत मी असतो तर ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असे म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता. मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे. काय चेष्टा लावली आहे?, असे नारायण राणे म्हणाले.

पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचे पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूया. जन आशिर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार आहे. मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही. आम्ही डबल आक्रमक आहोत. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होते ते पाहू?, असे आव्हान त्यांनी दिले.