TOD Marathi

टिओडी मराठी, महाड, दि. 24 ऑगस्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केलाय.

नारायण राणे यांना गोळवलीत अटक केल्यानंतर महाड इथं आणले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयामध्ये हजर होते.

यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला आहे. नारायण राणे यांचे वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी केली आहे.

नारायण राणेंना कोणती औषधे सुरू आहेत? याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली आहे. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा, अशी विनंती केली आहे. नारायण राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती दिली.

तसेच नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नाही, असे नारायण राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे.

नारायण राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविली होती, त्यामुळे महाड शहरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राणे यांच्या बचावासाठी भाजपचे कार्यकर्ते सुद्धा महाड शहरांमध्ये दाखल झालेत.

रत्नागिरी, रायगड, मुंबई या विविध भागातून राणेसमर्थक मोठ्या प्रमाणात शहरांत दाखल झाल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते समोर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला आहे.