नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं आहे. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः अशा देशांची, ज्यांच्यावर शांती आणि लोककल्याणाची मोठी जबाबदारी आहे. यामुळेच भारताने या परिषदेचा स्थायी सदस्य होणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.
एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, सदस्य देशांमध्ये सध्या अशी चर्चा आहे, की सुरक्षा परिषदेवर अधिक प्रभावी प्रतिनिधींची गरज आहे. जगाच्या भल्यासाठी आपलं चांगलं योगदान देऊ शकेल अशा देशांमध्ये भारताचा नक्कीच समावेश होतो. सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणेसाठी आवाज उठवणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रगण्य आहे. भारत येत्या काही वर्षांमध्येच महासत्ता होऊ शकतो.
कोरोसी पुढे म्हणाले, की जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतची स्थापना झाली, तेव्हा भारत मोठ्या देशांपैकी एक नव्हता. मात्र, सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा सुरू आहे. गेल्या १३ वर्षांपासून याबाबत सदस्य देशांमध्ये बोलणी सुरू आहे. ही नक्कीच खूप लांबलेली प्रक्रिया आहे. याची सगळ्यात पहिली चर्चा ४० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. सुरक्षा परिषदेची कार्यपद्धती, सदस्यता, स्थायी सदस्य, व्हीटो अधिकार अशा अनेक बाबतीत सुधारणा गरजेची आहे. सदस्य देशांमध्ये याबाबत एकमत निर्माण झाले, तर नक्कीच सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा केली जाऊ शकते.
कोरोसी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचंही कौतुक केलं. ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. आमच्या बैठकीदरम्यान माझ्या लक्षात आलं की ते एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत. आधुनिक भारत कसा दिसायला हवा याबाबत त्यांचं मत अगदी स्पष्ट आणि परखड आहे. मला त्यांना भेटून भरपूर आनंद झाला. संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांना भरपूर मान मिळतो. अगदी कमी कालावधीमध्ये ते जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक झाले आहेत.