TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)  पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )  यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  यांच्या विधानावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या महाराष्ट्र द्रोहींना अद्दल घडवायची वेळ आली आहे. राज्यपालपदाची झूल पांघरली म्हणजे वेडवाकडं बोलावं असं नाही. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे हे पाहायला हवं असं म्हणत राज्यपालांवर जोरदार टीका केली. राज्यपालांवर टीका करत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. केंद्र सरकारला कळलं पाहिजे महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा देश नाही असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:     

  • सर्व पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवा, कोश्यारी नावाच्या पार्सलला परत पाठवा
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून कुठलीही अपेक्षा नाही पण महाराष्ट्रातील नेत्यांचा स्वाभिमान कुठे गेलाय?
  • वृद्धाश्रमात जागा नाही अशा लोकांना राज्यपाल पदी नेमलं जात आहे
  • कोश्यारींकडून मराठी अस्मितेचा अपमान, त्यांना राज्यपाल म्हणणार नाही
  • महाराजांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात
  • ज्यांनी अपमान केला त्यांच्याच पक्षाकडून मुळमुळीत प्रतिक्रिया
  • सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळतंय
  • कालची महाराष्ट्राची कॅबिनेट बैठक पुढे का ढकलली?
  • एकत्र येऊन महाराष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवू, वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू

 

असे विविध मुद्दे उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांसह केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरही टीका केली.