TOD Marathi

Akluj ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर, ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश ; Mohite Patil जिंकले अन Pawar हरले!

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पंढरपूर, दि. 5 ऑगस्ट 2021 – अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर व्हावे, या मागणीसाठी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी अकलूजमध्ये अनेक वेळा ग्रामस्थांसह नेत्यांनी आंदोलनेही केली. अखेर याला यश आलं असून या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रुपांतर करण्यास मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात आज निर्णय घेतला आहे.

अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर होण्याला उप मुख्यामंत्री अजित पवार यांचा विरोध होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र, हा विरोध डावलून मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवार हरले अन मोहिते पाटील जिंकले अशी चर्चा होत आहे.

मोहिते – पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय वैर नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.‌ शिवसेनेने देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध डावलून मोहीते पाटलांची मागणीला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षामध्ये राहूनही त्यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर यशस्वीपणे करून घेतले आहे. यामुळे सध्या अकलूजमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

अकलूज- माळेवाडी आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायतींचे पालिका आणि नगरपंचायत करणे, याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध होता, असा आरोप ही मोहिते-पाटील यांच्याकडून वारंवार केला जात होता.

याच मागणीसाठी मागील दीड महिन्यापासून अकलूज ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच हि मागणी सरकारकडे ही लावून धरली होती. अखेर याला यश आले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी अकलूज ग्रामपंचायत –
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतीकडे पाहिले जात होते. अकलूज ग्रामपंचायतीसह माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदे मध्ये रूपांतर करावे, या मागणीसाठी अकलूजकरांनी राज्य सरकारच्या विरोधात दोन महिन्यांपासून उपोषण सुरू केले होते.

अकलूज नगरपरिषदेवर माळशिरस तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती केलीय. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज माळेवाडी, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग या ग्रामपंचायतींचे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, असे ठराव शासनाकडे दिले होता. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली होती.

मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अकलूज माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहिला. राज्यातील अन्य ग्रामपंचायतींचे नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, अकलूज माळेवाडीचा प्रस्ताव रखडला.

यातूनच इथल्या ग्रामस्थांनी या मागणीसाठी सरकारविरोधात आंदोलन केले. सलग दोन महिने हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर आज राज्य सरकारने ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेतली.

अकलूज, माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर केले आहे. तसा अध्यादेश ही राज्य सरकारने आज पारित केला आहे. आज या आंदोलनाला यश आलं आहे.