टिओडी मराठी, रत्नागिरी, दि. 26 जून 2021 – रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके या दरम्यान करबुडे बोगदयात आज शनिवारी पहाटे 4.15 वाजता कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे हजरत निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरले. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील काही तासामध्ये मार्ग पूर्ववत होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी कोकण रेल्वेची यंत्रणा तात्काळ रवाना झाली. सध्या इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकामध्ये थांबविल्या आहेत.
या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित आहेत, असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.
पुढील काही तासामध्ये मार्ग पूर्ववत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ऐन बोगद्यात अपघात झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काहीकाळ ठप्प राहणार आहे.