TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 1 ऑगस्ट 2021 – टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट खेळी करत पी. व्ही. सिंधूने भारतासाठी कांस्यपदक पटकाविले. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. याअगोदर मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्यात आता सिंधूने कांस्यपदक आणून भर घातली आहे.

या विजयासह ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलीय. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. तिच्या व्यतिरिक्त बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यामध्ये सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवत पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने उत्तम सुरुवात करून ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर बिंग जिआओ दबावाखाली आहे, असे दिसले.

हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधू विरुद्धच्या दुसऱ्या गेममध्ये बिंग जिआओनेही पुनरागमनचा प्रयत्न केला. सिंधूने मात्र कमी चुका करून आघाडी कायम राखली. जिआओने पुन्हा ११-११अशी बरोबरी साधली पण, विश्वविजेत्या सिंधूने १६-१३ अशी आघाडी वाढवली आहे.

सिंधूचे ‘सुवर्णचे स्वप्न’ अपूर्ण राहिले –
बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने सिंधूचा पराभव केला. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरे राहिले.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी २६ वर्षीय सिंधू यावेळी त्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती. मात्र, चायनीज तैपईच्या २७ वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर २१-१८, २१-१२ असे दोन गेममध्ये वर्चस्व गाजविले. ही लढत तिने ४० मिनिटांत जिंकली.