सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने डोलो-650 औषध निर्मात्यावर, डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना डोलो-650ची विक्री वाढविण्याच्या मोबदल्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू दिल्याचा मोठा आरोप केला आहे. 6 जुलै रोजी नऊ राज्यांमधील बेंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने हा दावा केलेला आहे. (Dolo 650 tablet)
एका निवेदनात, सीबीडीटीने सांगितले की, औषध निर्मात्यावर कारवाई केल्यानंतर विभागाने 1.20 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.40 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या संदर्भात मायक्रो लॅबला पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. सीबीडीटीने म्हटले की, शोध मोहिमेदरम्यान, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले असून ते जप्त केले आहेत.