TOD Marathi

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे कमी होतं की काय काँग्रेस मधील एक गटच पक्षाबाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निवेदन करत पडदा टाकला होता. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षाच्या मजबुतीसाठी ते प्रयत्न करतील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

त्यानंतर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विश्वजीत कदम यांनी स्वतः या चर्चा फेटाळल्या. त्यानंतर सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने का होईना मात्र बाळासाहेब थोरात विश्वजीत कदम यांना भेटण्यासाठी सांगली पोहोचले आणि ते काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

भेद निर्माण करणे ही भाजपची जुनीच परंपरा आहे, भाजपच्या कामाची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस एकजूट आहे. अशा शब्दात माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर हल्ला चढवला. आणि कोणीच काँग्रेस मधून जाणार नाही असा विश्वास देखील व्यक्त केला. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघातील पलूस अंकलखोप येथे ते बोलत होते. बाळासाहेब थोरात यांच्या हा दौरा विश्वजीत कदम यांची मनधरणी करण्यासाठी होता का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.