टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जुलै 2021 – कोरोनाची राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले जातील. तर, उर्वरीत ११ जिल्ह्यांत कोणतेही निर्बंध शिथिल करणार नाही. या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढविण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या 1 ते 2दिवसांमध्ये जीआर निघेल, असे देखील त्यांनी सांगितलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि, महाराष्ट्र राज्यात करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचे प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी केली जात होती.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांत सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यात शिथिलता दिली जाणार आहे.
निर्बंध हटवण्यात आलेल्या 25 जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या 11 जिल्ह्यांत सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.
या सर्व चर्चेदरम्यान, मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत राहिलाय. मुंबईमध्ये करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडला आहे.
मात्र, या सगळ्याचे नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि, ज्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार आहेत. त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा केली आहे.
त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असणार आहे. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करता येतील.
थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. त्यासोबत, एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, लग्नात, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये. यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.