मुंबई: घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. नवरात्रीच्या उत्सवापासून राज्यातील सर्व मंदिरे उघडली गेली. आता सर्व शाळा आणि महाविद्यालयेही उघडण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.
संजय राऊत यांनी त्यांच्या आग्रलेखात भाजपवर टीका करताना म्हणलंय की, काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.
आता परिस्थिति आटोक्यात आली आहे त्यामुळे सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.