टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जून 2021 – भारतात सध्या तिसऱ्या आघाडीचे वारे जोरात वाहत आहेत. कारण दिल्लीत एकीकडे खासदार शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमुळे याला दुजोरा मिळत आहे. हे होत असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला गेलेत. नाही नाही म्हणत राजकीय चर्चा सुरूच असल्याचं यावरून समजत आहे.
शरद पवार सध्या दिल्लीमध्ये असून प्रशांत किशोर पुन्हा एकदा आज पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील 48 तासांतील ही दुसरी भेट आहे. तर, 15 दिवसांतील तिसरी भेट आहे. या भेटींमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
प्रशांत किशोर यांनी सोमवारी खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याअगोदर 11 जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवार यांच्याशी ३ तास चर्चा केली होती.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चर्चेला उधाण आलं होतं.