टिओडी मराठी, कोलकता, दि. 7 सप्टेंबर 2021 – पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये 120 ते 130 जागा जिंकणारा पक्ष विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीचे नेतृत्व करेल, तशी संधी काँग्रेस पक्षाला आहे, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी सोमवारी मांडली आहे.
भाजपचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी 2024 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या उद्देशातून विरोधक प्रयत्नशील आहेत. विरोधकांची आघाडी स्थापन झाल्यास नेतृत्व कुणाकडे जाणार?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
त्याबाबत खुर्शिद यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले कि, विरोधी पक्षांत काँग्रेस हाच सर्वांत मोठा पक्ष असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केलाय. केवळ 2 जागा जिंकणारा पक्ष विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करणार नाही. नेतृत्वाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर 120 जागा आहे. लोकसभेच्या सुमारे 250 जागांवर काँग्रेस पक्षाची थेट लढत भाजपशी होणार आहे, असे म्हणत त्यांनी स्वपक्षाला विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी असल्याचे सूचित केले.
विरोधी पक्षांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवापासून बोध घ्यायला हवा. केंद्राच्या सत्तेत भाजपला आणखी दशकभर पाहायचे का? ते विरोधकांनी आणि विशेषत: प्रादेशिक पक्षांनी ठरवावे. भाजप राज्यांत प्रादेशिक पक्षांशी लढत आहे. त्यामुळे त्या पक्षांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असा इशाराही खुर्शिद यांनी दिलाय.