TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सकाळी 11 वाजता सुरु झाले. कोरोनामुळे हे अधिवेशन दोन दिवसांचे असणार आहे. या अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर सरकारकडून या प्रश्नांना उत्तरे देण्याचा किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होणार आहे, असे समजत आहे.

हे मुद्दे गाजणार
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक या वेळी होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आक्रमक भूमिका घेणार आहेत.

विरोधक राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, कोरोना काळात लोकांसमोर आलेल्या विविध समस्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसींचे राजकीय आरक्षण यावरून सरकारला कोंडीत पकडतील. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेले ईडीचे समन्सही विरोधकांच्या निशाण्यावर असणार आहेत.

स्वप्नील लोणकर या तरुणाने केलेली आत्महत्या आणि एमपीएससीचा कारभार या विषयावर देखील चर्चा होईल.

आज विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन 2021-22च्या पुरवणी भागाच्या मागण्या सादर होणार आहेत. तसेच वेगवेगळ्या विभागांची कागदपत्रेही सभागृहासमोर मांडली जाणार आहेत.

फडणवीस सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या काळात राज्यात 33 कोटी वृक्ष लावण्याच्या मोहिमेसंदर्भात स्थापन केलेल्या चौकशी समितीला काम पूर्ण करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही आज विधानसभेसमोर मांडण्यात येणार आहे.

तसेच माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, राज्यसभा खासदार आणि माजी आमदार राजीव सातव, माजी मंत्री संजय देवतळे, रामप्रसाद बोराडे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे दुःखद निधन झाल्याबद्दलचा शोकप्रस्तावही सभागृहासमोर मांडला जाणार आहे.