TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जून 2021 – जेव्हा राजकीय मुलाखती अथवा भेटी होत असतात, तेव्हा राजकीय चर्चा होतात. पवार यांच्यासोबत मी पूर्वी कधी काम केले नाही. जेव्हा राजकीय भेटी होतात. तेव्हा राज्यांच्या हिशेबाने भाजपच्या विरोधात कोणता मुद्दा काम करेल किंवा करणार नाही? याबाबत चर्चा होत असते. मात्र, त्यात तिसऱ्या आघाडीचा समावेश नाही, असे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या विरोधात उभे राहिले जाऊ शकते, हा संदेश पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाने दिला आहे, असा दावा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. सगळी राज्ये आणि प्रादेशिक पक्षांना हा संदेश आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १५ दिवसांत दोन वेळा भेट घेतली. दुसरी भेट दिल्लीमध्ये झाली. त्यानंतर पवार यांनी राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले. त्यावरून राजधानीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, शरद पवारांची भेट घेतली ती त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी.

प्रशांत किशोर यांनी अनेक प्रादेशिक पक्षांना राज्यांमध्ये मदत केली आहे. त्यातील काही पक्ष त्या त्या राज्यात सत्तेवर आलेत. किंबहुना भाजपलाही त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली होती. त्यामुळे ते आता राज्यांच्या बाहेर पडून केंद्रामध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे, असा अनुमान बांधला जातो आहे. मात्र, प्रशांत किशोर याचा इन्कार करत आहेत. ते म्हणतात की, तिसऱ्या आघाडीचे मॉडेल आता जुने झाले आहे.

सध्या स्थितीमध्ये ते मॉडेल फिट बसणार नाही. त्यामुळे काहीतरी वेगळी योजना आखावी लागणार आहे. मात्र, असे असले तरी ज्यात कॉंग्रेस पक्ष सहभागी नसेल तर त्या योजनेला कितपत मूर्त रूप प्राप्त होऊ शकते? याशिवाय प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहीलेल्या नाहीत.

अशात जर एखादा पर्याय उभा केलाही गेला तरी त्यात राज्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना त्याचा नेमका लाभ काय होणार? हा प्रश्‍न अनुत्तरीत राहत आहे.