टिओडी मराठी, इस्लामपूर, दि. 24 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसे सहकारी निवडले आहेत?, याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला आणि देशाला कळली. राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, अशा शद्बात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केलीय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्ध असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात याअगोदर कधीही कुणी वापरलेली नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी हाणला.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले ते अवमानकारक वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावे लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा. नाहीतर राज्यात आणि देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपाचे लोक लागले आहेत, असे चित्र निर्माण होईल,असा टोलाही जयंत पाटील यांनी हाणला.
अशा पध्दतीने बोलणाऱ्या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व द्यावे? याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उद्धव ठाकरेंचा द्वेष असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने ही भाषा वापरली त्याबद्दल मी निषेध करतो, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.