TOD Marathi

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) दोघं दोन बाजूला गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्याही घरी गणपती बाप्पाचे दर्शन एकनाथ शिंदे यांनी घेतलं. त्यापूर्वी दसरा मेळावा कुणाचा होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

आतापर्यंत केवळ शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा अर्ज मुंबई महानगरपालिकेकडे यासंदर्भात आला होता. त्यामुळे, शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला जाईल असं वाटत होतं. यापूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना महापालिका त्यांचं काम करेल मात्र दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहील आणि आपला दसरा शिवाजी पार्कवर होणारच असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होण्याची चिन्ह आहेत.

शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेत (My BMC) परवानगी मागितली आहे. दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील असेही ते म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.