मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी केली जात आहे.
मात्र, गुरुवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे ठाकरे बंधूंच्या मनोमीलनच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले. गुरुवारी मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. अभिजित पानसे हे मनसेकडून युतीचा प्रस्ताव घेऊन राऊतांकडे गेले होते, अशी चर्चा आता रंगली आहे.
हेही वाचा” …“कायदे आम्हालाही कळतात, त्यामुळे जे लोक…”, छगन भुजबळ कडाडले”
प्राथमिक माहितीनुसार, अभिजित पानसे आणि संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी भांडूप ते दादर असा एकत्र प्रवास केला. त्यानंतर पानसे हे संजय राऊत यांच्यासोबत प्रभादेवी येथील सामना कार्यालयात पोहोचले. काही मिनिटं याठिकाणी थांबल्यानंतर अभिजित पानसे आपल्या गाडीने माघारी निघाले. यावेळी त्यांनी मी वैयक्तिक कारणासाठी संजय राऊतांना भेटलो, असे सांगितले. परंतु, यानंतरच्या घडामोडी रंजक होत्या. ‘सामना’च्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर संजय राऊत आणि अभिजित पानसे आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडले. यानंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर गेले. तर अभिजित पानसे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ येथे गेले. त्यामुळे मनसेकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेला आणखीनच उधाण आले.
अभिजित पानसे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी होत असल्याची गोष्ट मला आत्ता समजली आहे. पण मला वाटतं की, सध्याचा घोडेबाजार पाहून लोकांचा राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास बसला आहे. कालपर्यंत सख्खे वैरी असणारे लोक आज भाऊ म्हणून सत्तेत बसले आहेत. संजय राऊत यांच्याकडे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो.