नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दोन पाकिस्तानी नागरिकांसह सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आरोपींपैकी एक महाराष्ट्रातला असल्याचे समोर आले आहे. जान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.
गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काम सुरू केलं आणि त्यांच्या तपासाला यश आलं. हे दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ल्या करण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांना अल कायदा, आयएसआयएस यासारख्या दहशतवादी संघटनांसह अंडरवर्ल्डची त्यांना साथ होती. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस हा फंडिंग करत होता. आयएसआयएस त्यांना शस्त्रास्त्र देत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.