TOD Marathi

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र अद्याप ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही तसंच रेंगाळत असल्याने आता भाजप एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे. आता ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे,’ अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.