मुंबई | मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र केलं होतं. याविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यावर त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्वोच्च न्यायालयात न्याय जिवंत आहे. न्याय मेलेला नाही. काही न्यायमूर्ती रामशास्त्री बाण्याचे आहेत. राहुल गांधींना कोणत्या कारणासाठी शिक्षा ठोठावण्यात आली होती? हे कळत नाही. आमच्यावरही असंख्य मानहानीचे खटले आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा “…‘मी मुख्यमंत्री बोलतोय’च्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साधणार जनतेशी संवाद’
“गुजरातमधील उच्च न्यायालयापर्यंतच्या कोर्टांचा संविधान आणि घटनेशी काडीमात्र संबंध राहिला नाही. राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात राहुल गांधींकडून ज्या पद्धतीने हल्ले करण्यात आले, ‘भारत जोडो’च्या माध्यमातून देशाचं वातावरण ढवळून काढलं. २०२४ साली राहुल गांधी आपली सत्ता उलथवतील म्हणून, उच्च न्यायालयाला हाताशी धरून राहुल गांधींना शिक्षा सुनावली गेली. पण, मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.