जळगाव:
राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. याच यात्रेच्या निमित्ताने जळगाव (Jalgaon) येथे सभा होती. गेले काही दिवस सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा गाजवत आहेत. मात्र जळगावमधील सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) आक्रमक झाल्या आहेत. “मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. माझ्या कारच्या पुढे 500 पोलिसांचा गराडा आहे. पोलिस मला काय जीवे तर मारणार नाही ना असा प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह जळगाव जिल्हा प्रशासनावर टीका केली आहे (Sushma Andhare has criticized the Jalgaon district administration along with the Shinde-Fadnavis government).
जळगावमध्ये सुषमा अंधारे यांची सभा होती. परंतु, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) ठाम आहेत. त्यामुळे त्यांना आता नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांना पोलिसांनी जळगावमधील हॉटेल के. पी. प्राईड येथे नजर कैद केले आहे. मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेणारच असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने जळगाव वरून मुक्ताईनगरकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैद केले. साध्या वेशातील पोलिस आणि महिला पोलिसांचाही हॉटेलबाहेर गराडा आहे.
आधी सभेला परवानगी नाकारली आणि त्यानंतर नजर कैद करण्यात आले. त्यामुळे सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. “मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे तर मारणार नाहीत ना? खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणीही 300 ते 400 पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मी संविधानिक विचार मांडते, तरीही तुम्ही घाबरता कशाला? असा प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओडले आहेत. मी जळगाव जिल्ह्यातले प्रश्न मांडत असेल तर माझा जीव घेणार का? मी सर्व गोष्टींना तयार असल्याचा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आता मुक्ताईनगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या सुषमा अंधारे यांच्या सभेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे, तसे आदेश प्रशासनाने पारित केले आहेत. ही सभा रद्द झाल्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.