TOD Marathi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची मुदत २४ जुलै २०२२ ला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. १८ जुलैला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिल्यानंतर सर्वसमावेशक चेहरा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांना दिल्लीतून निरोप आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे तातडीने दिल्लीला पोहचले असून आता त्यासंदर्भात बैठक सुरु आहे.

राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होत असून भाजपकडूनही काहीजण इच्छुक आहेत, पण त्यांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत. मात्र अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले. रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. सोमवारी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राष्ट्रपतीची निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली, पण सुशिलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (Pranit Shinde) या पक्षासाठी मेहनत घेत आहेत.

गेल्या काही काळात काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडत अन्य पक्षांच्या माध्यमातून सक्रीय झाले. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ‘ईडी’ (ED) लागली आहे. अशा परिस्थितीत सुशिलकुमार शिंदे यांचा पक्षाला आधार वाटत आहे. २००२ मध्ये भैरोसिंग शेखावत  यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज भरला होता.

आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होईल, अशी स्थिती आहे. तरीदेखील, या निवडणुकीत शिंदे हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, येत्या सोमवारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीच्या कार्यालयात पुन्हा एकदा चौकशीला जावे लागणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल, असे बोलले जात आहे.