TOD Marathi

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारप्रकरणावरून देशातील विरोधक एकवटले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ने या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून पुन्हा आगपाखड करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“या देशातील जनेतेची दुःख जाणून घेण्याला पंतप्रधान शो ऑफ म्हणत असतील तर इतकं क्रूर सरकार आणि राजरकारण आम्ही पाहिलेलं नाही. इम्फाळमध्ये कालही मोठे मोर्चे निघाले. पूर्ण देशात जिथं जिथं आदिवासी समाज आहे, तिथे मोर्चे निघत आहेत. काल महाराष्ट्रात तीन जागेवर आदिवासी समाजाने मोर्चे काढले. संपूर्ण आदिवासी समाज देशात सरकारविरोधात नाकाबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. मणिपूर हिंसाचारबाबतीत भाजपा अभद्र भाषेचा वापर करतं, मला वाटतं पूर्ण आदिवासी समाजाचा हा अपमान आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा ” …किशोर कदमांची पोस्ट; म्हणाले अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या…”

ठाण्यातील सभेवरून शिंदे गट आणि भाजपाने ठाकरेंवर टीका केली. तसंच, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरुनही ठाकरे गटाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावरून संजय राऊत म्हणाले की, “दिघेसाहेबांच्या अंत्यदर्शनाला कोण कोण उपस्थित होतं हे आम्हाला माहितेय. तेव्हाचे व्हिडीओ मिळाले तर पाहा. दिघेसाहेबांचं नाव गद्दारांसोबत जोडू नका. हा दिघे साहेबांचा अपमान आहे. दिघे हे निष्ठावंत शिवसैनिक होते, बाळासाहेबांचे निष्ठावंत होते. गद्दाराच्या तोंडी त्यांचं नाव ऐकायचं म्हणजे त्या निष्ठेचा अपमान आहे. त्यामुळे हे गद्दार काय म्हणातयेत याकडे पाहण्याची गरज नाही. काल गडकरी रंगायतन भरगच्च भरले होते. ते त्यांच्या डोळ्यांत खुपलं असेल”, असा पलटवार त्यांनी केला.