नवी दिल्ली : देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती देशभरात पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमिवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावी, अशी विनंती मोदी सरकारला केली आहे. देशनायक दिवस योग्य पद्धतीने साजरा करण्यात यावा आणि राष्ट्रीय नेत्याला आदराजंली वाहण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी हा विनंती केंद्राला केली आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ वी जयंती निमित्ताने दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तात्पुरता इथे होलोग्राम पुतळा ठेवण्यात येणार आहे.
तर नेताजींचा ग्रॅनाईटचा पुतळा 28 फूट उंच आणि सहा फूट रुंद असेल आणि 1968 मध्ये हटवण्यात आलेला किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा असलेल्या मंडपात त्याची स्थापना केली जाणार आहे. अमर जवान ज्योतीच्या विलनीकरणावरून विरोधकांनी सरकारव खूप टीका केली. या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना पंतप्रधान मोदींनी नेताजींचा पुतळा बसवण्याची घोषणा केली.
पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देत मोदींनी नेताजींना आदरपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नेताजींना आदरांजली वाहिली आहे.