केदारनाथ : उत्तराखंडमधील या वर्षीची चारधाम यात्रा सुरू होऊन साधारणतः तीन आठवडयांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र केदारनाथ परिसरात झालेली बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसानंतर यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
खराब हवामानाचा फटका केदारनाथ यात्रेला बसला आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळं ही यात्रा सोनप्रयाग येथेच यात्रा थांबवण्यात आली आहे. हेलीकॉप्टर सेवाही तात्पुरती थांबवण्यात आली आहे. तर भाविकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी केदारनाथ येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतप प्रशासनाने भाविकांना सोनप्रयागमध्येच थांबवण्यात आलं. त्याचबरोबर हेलिकॉप्टर सेवाही बंद करण्यात आली. तर, दुसरीकडे यात्रा थांबवण्यात आल्यामुळं १० हजारांहून अधिक भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. यात रुद्रप्रयाग ते गुप्तकाशीपर्यंत जवळपास ५ हजार यात्री अडकले आहेत. तर, सोनप्रयागमध्ये २ हजार आणि गौरीकुंडमध्ये ३२०० भाविक अडकून पडले आहेत.
पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने यमुनोत्री यात्रा देखील थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जानकीचट्टी येथे ही यात्रा थांबवण्यात आली. पावसाचा जोर ओसरल्यानंतर यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. पुढील काही दिवसांत वातावरण अधिक खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणुन सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यात्रा रोखण्यात आली आहे.