TOD Marathi

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या मुख्यालयात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केला आहे.

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. सिब्बल हे ज्येष्ठ वकील असून, यापूर्वीच्या काळात त्यांनी संसदेत अनेकदा चांगली मते मांडली आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते सभागृहात मांडतील.

कपिल सिब्बल हे काँग्रेसच्या हायकमांडच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. काँग्रेसने त्यांना यापूर्वी केंद्रीय मंत्रीपदही दिलेलं होतं. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडणे हा काँग्रेससाठी आणखी एक धक्का मानला जातोय.