नवी दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. यावेळी देशात घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, अशा घटनांवरून आरोप किंवा टीका करणाऱ्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला.
यावेळी मोदींनी मानवाधिकाराविषयी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला, मानवाधिकारांशी संबंधित एक अजून बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करू लागले आहेत. एक प्रकारच्या घटनेत काही लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसतं. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसत नाही. या प्रकारची मानसिकता देखील मानवाधिकाराला मोठं धोकादायक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
मानवाधिकाराचं उल्लंघन तेव्हा होतं, जेव्हा त्याला राजकीय दृष्टीने पाहिलं जातं. राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं. राजकीय फायदा-तोट्याच्या दृष्टीने पाहिलं जातं. या प्रकारचं वर्तन लोकशाहीसाठी नुकसानकारक आहे. असंच सोयीनुसार वर्तन ठेवणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून देशाला सावध राहायला हवं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे.