टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ओपन चॅलेंज दिलंय. खासदार शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील हे हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो. ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला देखील संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना हाणला आहे. ते शिरुर-हवेली इथे बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार, तेवढी तुमची शक्ती क्षीण होणार. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असंही संजयराऊत यांनी म्हटलंय.
शिवसेना हा लाव्हा आहे. कधीही शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटामध्ये आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा, असा सल्ला संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी बोलताना दिला आहे.