TOD Marathi

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Padmavibhushan Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी समारोपाचे औचित्य साधून “महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान, पुणे” यांचा पहिला ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार ‘ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते बालगंधर्व, पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे’ शिष्यवृत्ती इतिहासाचे अभ्यासक संदीप तिखे यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई मंगेशकर आणि अमृत पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी खासदार प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसिध्द उद्योजक पुनीत बालन, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिषेक जाधव, ॲड. विशाल सातव, डॉ. प्रसन्न परांजपे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात महानाट्य “जाणता राजा” संक्षिप्त स्वरूपात सादर करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्यावर आधारित “शिवशाहीर” या अनुबोधपटाची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अनुबोधपटाच्या निर्मितीची जबाबदारी विनोद सातव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पुढील वर्षापासून श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ११ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा उद्योजक पुनीत बालन यांच्यावतीने करण्यात आली.