विधानपरिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. राज्यसभेला भाजपला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेत भाजपला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)
याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. (Shivsena in MLC Election 2022)
पण अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखवला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांनी खासगीत मांडली आहे.
नगरविकास मंत्री शिदे (Ekanath Shinde) यांना मानणारा मोठा गट शिवसेनेत आहे. पक्षातील नव्या नेतृत्वाच्या ‘स्टाईलवर’ आक्षेप घेऊन ही वादाची ठिणगी पडली आहे.
भाजपने संख्याबळ नसतानाही विजय खेचून आणला. उलट राज्यसभेपेक्षा मतं जास्त मिळवत मोठ्या प्रमाणात आमदार फोडले. राष्ट्रवादीने अतिरिक्त सहा मतं मिळवली. तर शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांचा विजय झाला. मात्र ठराविक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यातच सर्व आमदार आणि मंत्री हॉटेलवर सोबत असताना एकनाथ शिंदे मात्र संपूर्ण प्रक्रियेपासून अलिप्त राहिल्याचं दिसलं. त्यामुळे शिंदे १३ आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचं दिसतंय. यामध्ये ठाकरे सरकार मधील काही महत्त्वाचे मंत्री देखील आहेत अशीही माहिती आहे.
त्यामुळे आता शिवसेनेच्या दुपारी असलेल्या बैठकीत काय चर्चा होते? त्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का?शिंदे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण होणार का? अशे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.