शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीतील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची देखील बैठक सुरू झालेली आहे. मुंबईतील बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करत आहेत तर दुसरीकडे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यापुढे आपल्या गटाचा प्रवास कसा असेल यासंबंधी चर्चा करत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षात महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही ठराव घेण्यात आलेले आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव कोणीही वापरू नये असं म्हणत शिवसेना शिंदे गटाविरोधात आक्रमक झाली आहे.
शिवसेनेने निवडणूक आयोगाला देखील एक पत्र दिलेलं आहे. अनिल देसाई विधान भवनात दाखल झाले आहेत 16 बंडखोर आमदारांना थोड्याच वेळात नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे देखील माहिती आहे.
सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्याठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत.