आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Mahapalika Election) तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यापूर्वीही म्हणजे २०१७ साली मुंबई महापालिका निवडणूक आपण भाजपविरोधात लढलो होतो आणि जिंकलो होतो, याची आठवण करुन देताना आताही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त करताना नगरसेवकांनी येत्या काळात नेमकं काय काम करायचं आहे याचा प्लॅनच उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत सांगितला.
शिंदे यांचं बंड झालं, तसेच भाजपासारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धा समोर असल्याने शिवसेनेसमोर मुंबई महापालिका जिंकण्याचं मोठं आव्हान आहे. येत्या दोनच महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यातच भाजपने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर देऊन एका अर्थाने प्रचाराचा नारळच फोडला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याशी संवाद साधला.
आपल्या विभागात सातत्यपूर्ण काम करा, सतत वॉर्डमध्ये फिरा आणि लोकांच्या संपर्कात राहा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या माजी नगरसेवकांना केलं. वॉर्ड पुनर्ररचना झाल्याने आरक्षण पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याचं सांगत २०१७ च्या वॉर्ड रचनेला आपला आक्षेप असून आपण याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.