TOD Marathi

वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत महाराष्ट्रात होणार असलेला प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. (Vedanta group project to transfer in Gujrat from Maharashtra) सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.

महाविकास आघाडीने (Mahavihar Aghadi) या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला आहे.