टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि.३० जुलै) निधन झालं. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केलीय.
राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021
तर, गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केलाय.
गणपतराव देशमुख यांनी पक्षनिष्ठा कायम जपली – अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिलीय. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीमध्ये ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला आहे. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढविला आहे.
गणपतराव आबांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2021
कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला – नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्ददल हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला.
महाराष्ट्राने सद्गुणी सुपुत्र गमावलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. सहकार चळवळीतून उभी केलेली सूतगिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू आणि माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृह शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे.
राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षाची नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झालेली आहे.
साधी राहणीमान, उच्च विचार, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर तब्बल अकरावेळा विधानसभेत निवडून येण्याची किमया शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी केली होती..
आम्ही एक जेष्ठ नेते गमावला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/YLNCkwu6xl— Nana Patole (@NANA_PATOLE) July 30, 2021
राजकारणातील भीष्म पितामह हरपला – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे.
याशिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला आहे, अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्यात.
गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला आहे.
एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला आहे, अशी आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.