TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 21 जून 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात आज दिल्लीमध्ये दुसरी बैठक पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रीय स्तरापासून ते राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

प्रशांत किशोर यांच्या सारख्या भाडोत्री चाणक्याला भेटावं लागत आहे, याचा अर्थ शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. राज्यातील सरकार काका-पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार आहे. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात?, मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठा समाजाच्या ताटात माती टाकण्याचं काम या सरकारने केलंय. बहुजनांवर अन्याय करण्याचे या सरकारचं षडयंत्र आहे. काँग्रेसचं ही काका-पुतण्यासमोर काही चालत नाही.