मुंबई: मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये १० जणांना ताब्यात घेतले आहे, यात एक बॉलिवूड सुपरस्टार म्हणजेच शाहरुख खान याचा मुलगा देखील आहे अशी माहिती समोर आली आहे. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे.
मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.
रेव्ह पार्टी होणार असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर, मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबईहून काही अंतर पुढे गेल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत. आर्यन खानसह १० लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.