TOD Marathi

भंडारा:

देशाच्या स्वातंत्र्यास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा स्वराज्य महोत्सवा निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम सुरु आहेत. विविध उपक्रमांच्याद्वारे देशाच्या स्वातंत्र्याला अभिवादन केले जात आहे. कायम प्रयोगशीलतेची धडे देणाऱ्या जिल्ह्यातील उपक्रमशील व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या सांस्कृतिक व नवोपक्रम विभागाकडून पंचाहत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फ्लॅशमॅाब साकारला. फ्लॅशमॅाब ही संकल्पनाच मुळात परदेशातली. वर्दळीच्या ठिकाणी विलक्षण हालचाली, नृत्य, वाद्य व वादन करुन जनमाणसांचे लक्ष वेधून घेणारा समूह हळूहळू विस्तारत जातो. झपाटल्यासारखी जनसामान्यांमधली माणसंही सामील होतात. काही क्षणात गाणे संपते. गर्दी ही विरळ होते. अशी भन्नाट कल्पना साकारण्याचे ठरवणारी ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली पहिली सरकारी शाळा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फ्लॅशमॅाब सादर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लाल बहादूर शास्त्री शाळेने केलेला हा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला. पण जि.प.च्या शाळेने केलेला हा उपक्रम राज्यातला (कदाचित देशातला) पहिला प्रयोगही ठरतो. (Flashmob presented by school students)

“मुलांना नवनवे प्रयोग करायला आवडते. त्याच त्या पठडीतले कार्यक्रम सादर करण्यापेक्षा नव्या दिशा धुंडाळाव्यात या नवीन आविष्कारास प्राधान्य दिले” असे विद्यालयाच्या प्राचार्या एम.एम.चोले या म्हणाल्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. देशाला वेगळ्या पद्धतीने अभिवादन करायचे असे ठरवूनच हा उपक्रम घडवून आणला गेला. शाळा समितीचे अध्यक्ष व शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी या उपक्रमाच्या आयोजनास पाठबळ देण्यासाठी शाळेकडून टिशर्ट्स उपलब्ध करुन दिले. जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी हा उपक्रम घडवून आणण्यासाठी पूर्व नियोजन केले. (District Collector Sandip Kadam planned this program well) मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन गाड्या उपलब्ध करुन दिल्या. पोलीस विभागाने सहकार्य केले म्हणून ही नवी कल्पना अंमलात येऊ शकली असे प्रतिपादन शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख स्मिता गालफाडे यांनी केले. साऊंड व विविध सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी व लोकसहभाग घेण्यासाठी क्रीडा प्रमुख सुनील खिलोटे, विजयकुमार बागडकर, यांनी प्रयत्न केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुढील प्रयोग घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत.
त्रिमूर्ती चौकात फ्लॅशमॅाबचा पहिला प्रयोग झाला. या पहिल्या प्रयोगास जिल्हाधिकारी संदीप कदम स्वत: हजर होते. मुलांचे त्यांनी कौतुक केले. आजादी का अमृत महोत्सव काळात बस स्टँड, राजीव गांधी चौक, गांधी चौक, मन्रो चौक अशा विविध चौकात फ्लॅश मॉबचे सादरीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी या प्रयोगांचा आनंद तर घ्यावाच पण नव्या आविष्कारात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.