TOD Marathi

मुंबई:

विधिमंडळ आणि लोकसभेत (Shivsena in Vidhansabha and Loksabha) शिवसेनेला मोठा हादरा दिल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेना भवन ताब्यात घेण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हापासून संपूर्ण पक्षच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे गटाची पावलं पडताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर (Shivsena Bhavan) ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाने (Eknath Shinde) हालचाली सुरु केल्याचे बोललं जातय. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. ते मंगळवारी दिल्लीत बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हणाले की, शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. दैनिक ‘सामना’ ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ही व्यवस्था करुन ठेवली आहे. पण एकनाथ शिंदे गटाला महाराष्ट्र तोडायचा आहे, त्यासाठी शिवसेना तोडायची आहे. उद्या शिवसेनेतील फुटीर गट मातोश्रीवरही कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. सत्तेची आणि बेईमानीची भांग पिणारे कुठेही जातात. उद्या हा फुटीर गट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही, असे म्हणायलाही कमी करणार नाही. एवढी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे. परंतु, बाळासाहेबांची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही. फुटीर गटाने ‘मातोश्री’, ‘सामना’ आणि ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेण्याचा विचारही करू नये, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.