TOD Marathi

ठाणे : राज्यात दोन आठवड्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Eknath Shinde CM) शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा जबरदस्त प्रवास शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना समर्थन आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज ठाण्यातील रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन महापालिका मुख्यालय येथे घोषणाबाजी केली. तसंच संपूर्ण शहरात रॅली काढली. (Eknath Shinde supported auto drivers in Thane)

‘एकनाथ शिंदे आगे बढो…धर्मवीर आनंद दिघे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,’ अशी घोषणाबाजीही यावेळी रिक्षाचालकांनी केली. (Hinduhruday SamratBalasaheb Thackeray, Dharmveer Anand Dighe) या रॅलीवेळी रिक्षाचालकांनी ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’ असं लिहिलेले टीशर्ट देखील परिधान केले होते. तसेच ‘होय, आम्हाला अभिमान आहे, आमचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला’ असा फलक देखील यावेळी पालिका मुख्यालयासमोर लावण्यात आला होता.

…आणि शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर

शिवसेनतून बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांकडून टीकास्त्र सोडलं जात आहे. विधिमंडळातील भाषणानंतर शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ‘रिक्षावाला सुसाट सुटला’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती. शिवसेनेकडून होणाऱ्या या टीकेला स्वत: एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थकही जोरदार उत्तर देत आहेत.