टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जून 2021 – अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीकडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 1325 कोटी रुपयांचे शेअर्स व वॉरंट जारी करण्यात येणार आहे. यात 59.5 कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश असून रिलायन्स पॉवरकडून रविवारी शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती दिली आहे.
13 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिलायन्स पॉवर 10 रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 59.5 कोटी इक्विटी शेअर्स देणार आहे. तसेच 73 कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू केलेत.
त्यामुळे रिलायन्स पॉवरवरील कर्जाचा भार 1325 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये रिलायन्स पॉवरचे एकत्रित कर्ज 3200 कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे.
तसेच नव्या समभागांमुळे रिलायन्स पॉवर कंपनीत रिलायन्स इन्फ्रा व अन्य प्रवर्तकांची भागीदारी 25 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. रिलायन्स इन्फ्राच्या ८ लाख शेअरधारकांना याचा फायदा मिळणार आहे.
6 जूनला रिलायन्स इन्फ्राच्या संचालक मंडळाने प्रिफेंशियल समभागांच्या माध्यमातून 550.56 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या पैशांचा उपयोग दीर्घकालीन गुंतवणूक आणि कर्ज कमी करण्यासाठी होणार आहे.