टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जून 2021 – सहकाराच्या समृद्धीसाठी एकमेकांच्या हातात हात घालून चालण्याचा निर्णय महानंद डेअरी आणि गोकुळ डेअरीने घेतलाय . त्यानुसार गोकुळचे दररोज सुमारे तीन लाख लिटर दूध गोरेगाव येथे पॅकिंग करून देण्याचा निर्णय महानंद डेअरीने घेतला आहे. प्रतिलिटर पॅकिंगमागे महानंदला 1 रुपया 55 पैसे मिळणार आहे.
1 जुलैपासून पॅकिंगला सुरुवात होणार आहे. महानंदने अधिक क्षमतेचा दूध पॅकिंग प्लॅण्ट उभारून कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र, सध्या महानंदचे दूध वितरण दीड पाऊण लाखापर्यंत खाली आलंय. त्यामुळे पॅकिंग प्लॅण्ट आणि मनुष्यबळाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. त्यामुळे महानंद डेअरीला आर्थिक चणचण जाणवतेय.
तसेच गोकुळलाही त्यांच्या नवी मुंबई येथील डेअरीत सात लाख लिटर दुधाचे पॅकिंग करणे शक्य होत नाही. त्यानुसार गोकुळने तीन लाख लिटर दूध महानंदकडून पॅकिंग करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता.
त्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख, उपाध्यक्ष डी. के. पवार, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही डेअरींत सामंजस्य करार झाला आहे.