TOD Marathi

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतंसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्राने उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अपरिपक्वता असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचं पत्र पाठवण्यापेक्षा पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश द्यायला हवेत, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. यासाठी दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावा असे राज्यपाल म्हणाले होते. मात्र राज्यपालांनी हे सुचवले होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नव्हता. तसेच सरकार कोणतेही असो किंवा कुठलेही राज्यपाल असो, त्यावर अशाच प्रकारचे पत्र पाठवण्यात येत असते. मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाने अपरिपक्वता दाखवली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार झाला असता. तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं.